जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचे सत्र सुरूच असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, या दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या साहित्यामध्य़े दोन हजार रुपयांच्या नोटाही सापडल्याने खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्याबरोबरच बनावट चलनी नोटा आणि दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी केंद्र सरकारने 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत होता. मात्र आज ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याबरोबरच चलनात नव्याने आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आढळल्या. त्यामुळे दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याबाबत नव्याने शोध घेण्याचे आव्हान गुप्तचर यंत्रणांसमोर असेल.
