नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरातील लग्नकार्याचा खोळंबा होऊ नये यासाठी वर आणि वधू या दोन्ही पक्षांना त्यांच्या बँक खात्यातून प्रत्येकी २.५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू देण्याची मोदी सरकारने उदारपणे केलेली घोषणा प्रत्यक्षात मृगजळ ठरण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने यासंबंधी सोमवारी जारी केलेल्या नव्या परिपत्रकातील जाचक आणि किचकट अटी पाहता खातेदारांना त्यांच्या खात्यातील हक्काचे पैसे देण्याऐवजी न देण्याकडेच अधिक कल दिसून येतो.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ही घोषणा केल्यानंतर असे पैसे काढण्यासाठी गेलेल्या अनेक वधू/वरपित्यांना, अजून रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट सूचना आल्या नाहीत, असे सांगून बँक अधिकाऱ्यांनी परत पाठविले होते. आता रिझर्व्ह बँकेचा हवाला देऊन बँक अधिकारी ज्या अटींचा पाढा वाचतील तो ऐकून लग्नघरच्या मंडळींना ‘भिक नको, पण कुत्रा आवर’, असे म्हणण्याची पाळी येईल.
लग्नासाठीची पुंजी कोणी बँकेच्या बचत खात्यात ठेवत नाही, हे वास्तव आहे. साठलेली रक्कम ‘एफडी’मध्ये ठेवून लग्न ठरल्यावर खर्चाचा अंदाज घेऊन या ‘एफडी’ मोडून पैशाची तजवीज केली जाते. आपणही असेच नियोजन केल्यास, तुम्हाला लग्नासाठी २.५ लाख रुपये मिळणे दुरापास्त होईल. पहिली अट हा यातील मुख्य खोडा आहे. याचे कारण, नोटाबंदीचा निर्णय झाला त्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यात जी शिल्लक असेल फक्त त्यातूनच २.५ लाख काढता येणार आहेत. परिपत्रकात वापरलेला ‘बँक अकाऊंट’ हा शब्द फक्त बचत खात्यांसाठी आहे की एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच बँकेत असलेल्या बचत, एफडी अशा विविध खात्यांसाठी मिळून आहे, याबाबत संदिग्धता आहे. (विशेष प्रतिनिधी)
>पैसे काढण्यासाठी जाचक अटी
काढता येणाऱ्या रकमेला 2.5 लाख रुपये कमाल मर्यादा असेल.‘केवायसी’ निकषांची पूर्तता करणाऱ्या खात्यातूनच रक्कम काढता येईल.रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच काढता येईल.जे व्यवहार फक्त रोखीनेच करणे भाग आहे अशाच खर्चासाठी
ही सवलत असल्याने ज्याला हे पैसे द्यायचे आहेत त्याचे बँकेत खाते नाही, याचे पुरावे अर्जदारास द्यावे लागतील.
>अर्जासोबत हवेत भाराभर पुरावे
रिझर्व्ह बँकेने अर्जाचा नमुनाही तयार केला असून नमुन्यात अर्ज करावा लागेल. त्यात वर आणि वधूचे नाव-पत्ते, त्यांचे ग्राह्य ओळखपत्र, लग्नाची तारीख इत्यादी तपशील द्यावा लागेल. याखेरीज अर्जासोबत पुढील कागदपत्रे पुराव्यादाखल जोडावी लागतीललग्न होणार असल्याचा पत्रिकेसह इतर पुरावा.
कार्यालय, कॅटरर इत्यादींकडे बुकिंग करून त्यांना दिलेल्या अग्रिम रकमांच्या पावत्या.कोणाला कसासाठी पैसे
द्यायचे आहेत याचा तपशील. लग्नखर्चापैकी ज्यांना रोखीने रक्कम द्यायची आहे अशा व्यक्तींची पूर्ण यादी.ज्याला रोखीने पैसे द्यायचे आहेत त्याने त्याचे बँकेत खाते नसल्याविषयीचे सत्यप्रतिज्ञापत्र.
>रोखीचे व्यवहार नकोतच : लग्न खर्चासाठी खात्यातून २.५ लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा असली तरी शक्य होईल तेवढा खर्च चेक/ड्राफ्ट, क्रेडिट वा डेबिट कार्ड, मोबाईल ट्रान्स्फर, इंटरनेट बँकिंग, एनईएफटी / आरटीजीएस अशा रोखीखेरीज मार्गांनी करण्याची गरज बँक अधिकाऱ्यांनी लग्नघरच्या कुटुंबियांना पटवून द्यावी, असेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.
>बियाणे खरेदीसाठी जुन्या नोटांचा वापर
राज्य आणि केंद्र सरकारची तथा कृषी विद्यापीठांच्या विक्री केंद्रांतून बियाणे खरेदी करण्यासाठी बंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटा वापरण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र द्यावे लागेल. खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या बियाण्यांसाठी ही सवलत लागू राहणार नाही.
नवे नियम
कॅश क्रेडिट (सीसी) आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून आठवड्याला ५0 हजारांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. करंट खात्यातून आठवड्याला ५0 हजार काढण्यास या
आधीच परवानगी देण्यात आली होती.
गेल्या ३ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या करंट, सीसी, ओव्हर ड्राफ्ट खात्यातून एका सप्ताहात ५0 हजार रुपये काढता येतील. वैयक्तिक ओव्हरड्राफ्ट खात्याला मात्र ही सवलत लागू राहणार नाही.
>३० डिसेंबर किंवा त्यापूर्वी होणाऱ्या लग्नासाठीच हे पैसे मिळणार आहेत.वधू किंवा वराच्या पालकांपैकी एकास किंवा लग्न होणाऱ्यास स्वत:च्या खात्यातून पैसे मिळतील.
