नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाविरोधातील लढाईचा भाग आहे. नोटाबंदीला सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका, हा निर्णय लोकांच्या हितासाठीच आहे असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी अरुण जेटली यांनीदेखील नोटाबंदीचा निर्णय हा राष्ट्रहिताचा असून यामुळे गरिबी दूर करण्यात मदत मिळेल असं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष खासदारांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमोर बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाले. गरिबांना मदत करण्यासाठी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि पैशांची अफरातफर रोखण्यावर सरकारचा भर असेल असं आश्वासनाही मोदींनी यावेळी दिलं. विरोधी पक्ष चुकीची माहिती पसरवत असून लोकांना या निर्णयाच्या फायद्यांची योग्य माहिती द्या असंही मोदींनी खासदारांना सांगितलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचा निर्णय राष्ट्रहिताचा असून त्यामुळे गरिबी दूर करण्यात मदत मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. नोटाबंदीवर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत असंही जेटलींनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. तसंच नोटाबंदीला सर्जिंकल स्ट्राईक म्हणू नये असं आवाहनही त्यांनी केलं.
काही लोक म्हणतात अर्थमंत्र्यांनाही या निर्णयाची माहिती नव्हती आणि नंतर पक्षाला आधीपासूनच निर्णयाची माहिती होती म्हणतात, हे कसं काय शक्य आहे असं म्हणत जेटलींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका केली. जे अडीच वर्षात झालं, ते 70 वर्षात झालं नाही असंही ते बोलले आहेत.
नोटाबंदी काळा पैसा रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे त्यामुळे काही काळ त्रास सहन करावा लागेल. तसंच नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार आणि दहशतवादासाठी जाणाऱ्या पैशावर आळा बसेल असं अरुण जेटली बोलले आहेत. नोटाबंदीमुळे व्याजदरात घट दिसत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रब्बीचा हंगाम सुरु होत असल्याने पुढील काही दिवस ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं अरुण जेटली बोलले आहेत. तसंच गुप्तता पाळायची असल्या कारणाने एटीएम बदलणं शक्य नव्हतं असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. देशाच्या इतिहासात या निर्णयाचा उल्लेख असेल, अनेकांनी चर्चा केली पण लागू करण्याची हिंमत नव्हती, पंतप्रधानांनी ते करुन दाखवलं असल्याचं अरुण जेटली बोलले आहेत.
