‘उरी’त दहशतवाद्यांनी जवान मारले नाहीत तितकी माणसे नोटबदलात दगावली

‘उरी’त दहशतवाद्यांनी जवान मारले नाहीत तितकी सामान्य माणसे नोट बदलात दगावली आहेत.’ भाजपावर हवाई हल्ला गरजेचा आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.

नोटाबंदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. ती मागणी सत्ताधारी भाजपाने फेटाळून लावली. यामुळे निर्माण झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

नोटाबंदीच्या निर्णयावर बोलताना आझाद म्हणाले की, ‘उरी’त दहशतवाद्यांनी जवान मारले नाहीत तितकी सामान्य माणसे नोट बदलात दगावली आहेत. भाजपावर हवाई हल्ला गरजेचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आझाद यांनी नोटाबदलाच्या मोहिमेबाबत ‘उरी’चा हल्ल्याचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधा-यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.

आझाद यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी सत्ताधा-यांनी केली. तर काँग्रेसने आझाद यांचे विधान कामकाजातून काढण्याची मागणी केली. सरकारच्या निर्णयामुळे ४० जण दगावले आहेत. त्यामुळे या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी निवेदन केले पाहिजे. ते येईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका आझाद यांनी घेतली.

सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांचे बळी जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल हल्ला केला होता, आता भाजपावर हवाई हल्ला करणे गरजेचे आहे. तुमच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांचे बळी जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *