विषारी दारूने घेतले १३ बळी!

विषारी दारूने घेतले १३ बळी!

विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बळींची संख्या वाढण्याची भीती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राजू लंगडा व शंकर या दोन दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले.

लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कुटुंबीय राहतात. बुधवारी रात्री येथील नागरिकांनी गावठी दारूचे प्राशन केले. गुरुवारी पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. अनेकांना उलट्या-जुलाब, छातीत दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. त्यांना मालाडच्या खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकरापैकी तिघांचा मृत्यू प्राईम रुग्णालयात, ५ जणांचा शताब्दी रुग्णालयात, एकाचा सिद्धार्थ रुग्णालयात तर ४ जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनास्थळी धाव घेतली. इथिल अल्कोहोलपासून ही विषारी दारू बनविण्यात आल्याची माहिती समोर आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले की, उपचार घेणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तसेच याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती, उत्तर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील रात्री उशिरापर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पाटील यांनी  सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *