मधुमेहाच्या सात टक्के रुग्णांना अंधत्व!

आज जागतिक मधुमेह दिन

भारतात मधुमेही रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जवळपास सहा कोटी ८० लाख लोकांना मधुमेह झाला आहे. यापैकी सहा टक्के मधुमेही रुग्णांना म्हणजे सुमारे ४५ लाख लोकांना अंधत्व आले असून जगभरात मधुमेहामुळे निर्माण होणारा दृष्टिदोष लक्षात घेऊन ‘जागतिक आरोग्य संघटने’ने यंदा मधुमेह दिन हा डोळ्याची काळजी घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये डोळ्याच्या आजाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने तसेच भारतातील मधुमेह व नेत्रतज्ज्ञांच्या संघटनांनी ज्यांना मधुमेह झाला आहे, अशा लोकांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतात २०००साली मधुमेही रुग्णांची संख्या साडेतीन कोटी एवढी होती ती २०१५ मध्ये वाढून साडेपाच कोटी एवढी झाली होती. गेल्या वर्षभरात हीच संख्या वाढून सहा कोटी ८० लाख एवढी झाली आहे. यातील १२ टक्के मधुमेहींना डोळ्याचे आजार असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. अनेकांना आपल्याला मधुमेह असल्याचीही

कल्पना नसते आणि जेव्हा दिसण्यामध्ये अडचण निर्माण होते तेव्हाच ही मंडळी डोळ्यांच्या तपासणीसाठी येतात आणि त्यांना मधुमेह असल्याचे लक्षात येते. मधुमेही रुग्णांनी डोळ्यांची विशेषत्वाने काळजी घेणे आवश्यक असून भारतात जवळपास ४५ लाख मधुमेहींना वेळीच काळजी न घेतल्यामुळे अंधत्व आल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले. जगभरात मधुमेही रुग्णांमधील डोळ्याच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने यंदाचे वर्ष हे ‘आय ऑन डायबिटिक’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. मधुमेहामध्ये केवळ मधुमेहाचाच विचार न करता रक्तदाब, क्रियेटिन व कोलेस्ट्रोलचाही विचार करणे आवश्यक असल्याचे लीलावती रुग्णालयातील मधुमेह व एंडोक्राईन तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. ‘क्रोनोबायोलॉजी ऑफ डायबिटिस’यावर अभ्यास करणाऱ्या डॉ. जोशी यांच्या म्हणण्यानुसार वेळेवर झोपणे, पुरेशी झोप, सकाळी योग्य नाश्ता व जेवण, रात्री कमी खाणे तसेच नियमित चालण्याचा व्यायाम मधुमेही रुग्णांनी करणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास मज्जासंस्थांचे आजार, हृदयरोग तसेच डोळ्यांचा आजार होऊ शकतो. यातही डोळ्यातील रक्तवाहिन्या खराब होऊन (रेटिनोपथी) दृष्टी जाण्याचे प्रमाण भारतात वाढत असल्याने काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. हिंदुजा रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रीतम सामंत यांच्या म्हणण्यानुसार मधुमेह झालेल्या रुग्णांनी सहा महिन्यातून एकदा डोळे तपासणे आवश्यक आहे. रेटिनोपथीमध्ये डोळ्याचे जे नुकसान होते ते लेझर शस्त्रक्रियेनेही भरून येत नाही तर केवळ पुढे होणारी गुंतागुंत रोखता येते असेही सामंत म्हणाले.

डायबिटिक रेटिनोपथीची लक्षणे

नजरेसमोर काळे ठिपके दिसणे. चष्म्याच्या नंबरमध्ये वारंवार बदल होणे. अंधूक दिसणे, रात्रीचे कमी दिसणे तसेच अचानक नजर जाणे. रेटिनोपथीमध्ये डोळ्यातील रक्तवाहिन्या वेडय़ावाकडय़ा होऊन फुटणे, डोळ्यातील मध्यभागात सूज येणे, वारंवार डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्त्रावामुळे रेटिना आकुंचित होऊन खेचला जाणे..यात नियमित तपासणी करून योग्य ते उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *