केंद्र सरकारने दैनंदिन व्यवहारातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा अवैध ठरविल्याने याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला आहे. याच जुन्या नोटा स्वीकारण्यास गोवंडी येथील एका रुग्णालयाने नकार दिल्यामुळे उपचारांअभावी अवघ्या तीन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सहा हजार रुपये सुट्टे वा नव्या नोटांमध्ये नसल्यामुळे जगदीश शर्मा यांना त्यांचे नवजात बाळ गमवावे लागले. डॉक्टरांनी या प्रकरणाचा इन्कार केला असला तरी शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘डॉक्टरांनी समजूतदारपणा दाखवला असता तर, आमच्या बाळाचे प्राण वाचले असते.. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्या,’ अशी विनंती शर्मा यांनी केली आहे.
गोवंडी येथील जीवनज्योत रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. शर्मा यांची पत्नी किरण हिने १७ एप्रिल रोजी रुग्णालयात नाव नोंदवले होते. स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. शीतल कामत त्यांची नियमित तपासणी करत होत्या. त्यांनी ७ डिसेंबरची प्रसूतीची तारीख दिली. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी पत्नी किरणला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि वेळेपूर्वी घरीच बाळाचा जन्म झाला.
शर्मा यांनी पत्नी व बाळाला तातडीने जीवनज्योत रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉ. कामत यांनी लगेचच पत्नीवर उपचार सुरू करून तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले व बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करा, त्यासाठी सहा हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगितले. मात्र, ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्याने माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते.
काही दिवसांनी जमा करतो, या माझ्या विनंतीस नकार देत डॉक्टरांनी बाळाला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. त्यानंतर आम्ही दुस-या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेण्यासाठी धावपळ केली. मात्र, उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला. डॉ. कामत यांनी तातडीने उपचार सुरू केले असते तर कदाचित बाळाला वाचवता आले असते, असा आरोपही शर्मा यांनी केला आहे.
डॉ. कामत यांनी फेटाळले आरोप
वेळेपूर्वी गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याने बाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती. बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्याची गरज होती. पण आमच्या नर्सिग होममध्ये तशी व्यवस्था नसल्याने आम्ही त्यांना शीव रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण कदाचित त्यांनी बाळाला रुग्णालयात नेले नसावे.
डॉ. सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश
रुग्णालयात हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारा, असे आदेश देऊनही या रुग्णालयाने नोटा स्वीकारल्या का नाहीत, याची मेडिकल कौन्सिलमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत डॉ. कामत दोषी ठरल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गरज पडल्यास नर्सिग होमवरही कारवाई करणार आहोत, असे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत.