दुचाकीसह पिता-पुत्र नाल्याच्या पुरात गडप

न्याहली (ता. नंदुरबार) येथील नाल्याच्या पुरात पिता-पुत्र दुचाकीसह वाहून गेल्याची घटना काल (ता. 16) सायंकाळी घडली. पुराच्या लोंढ्यात ते कुठे गडप झाले, याचा शोध आज सायंकाळपर्यंत सुरूच होता. त्यांच्या शोधासाठी नाल्यावर असलेला बांध ग्रामस्थांच्या मागणीनुसार फोडण्यात आला.

न्याहली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी संजय लक्ष्मण गिते (वय 47) व त्यांचा मुलगा अभिषेक (17) हे दोघे नंदुरबारला आले होते. अभिषेकने यंदाच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याच्या अकरावी प्रवेशासाठी ते येथे आले होते. काम संपवून हे पिता-पुत्र दुचाकीने कोपर्लीकडे जात होते. दरम्यान परिसरात जोरदार पाऊस बरसत होता. त्यामुळे कोपर्लीच्या अलीकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. या पुराचे पाणी नाल्याच्या फरशीवरून वाहत होते. मात्र, नेहमीच्या वापराचा रस्ता असल्याने गिते यांनी दुचाकी पुलावरून दामटली आणि इथेच त्यांचा घात झाला. नाल्याच्या पुराचा ओढा इतका जबरदस्त होता, की मोटारसायकलसह तो गिते पिता-पुत्राला आपल्यात गडप करून निघून गेला.

दुचाकी सापडली
या प्रकाराची माहिती काहींनी तत्काळ गावात दिली. काही मिनिटांतच ग्रामस्थ नाल्याकाठी जमले. त्यांनी संजय आणि अभिषेक यांचा शोध सुरू केला. रात्री विविध वाहनांच्या प्रकाशझोतात शोध घेण्यात आला. मात्र यश आले नाही. आज सकाळी मोटारसायकल सापडली, पण गिते पिता-पुत्राचा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत शोध लागला नाही. या नाल्यावर पुढे बंधारा बांधण्यात आला आहे. त्यात ते अडकले असावेत, असा कयास बांधत ग्रामस्थांनी बंधारा तोडण्याची मागणी केली.

घटनास्थळी तहसीलदार महेश शेलार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल चौधरी, समाजसेवक ईश्‍वर साठे, श्री. सय्यद यांसह अनेक जण उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार जेसीबी आणि पोकलॅंड यंत्राचा वापर करून बंधाऱ्याचा दीड फूट भाग तोडण्यात आला. त्यातील पाणी वाहू लागले. मात्र आजही परिसरात पाऊस पडला. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा वेगवान प्रवाह आजही कायम राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *