दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बनावट पदवीची ज्याप्रमाणे चौकशी करण्यात आली. तशीच चौकशी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीचीही करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केली आहे.
गाझियाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी इराणींच्या पदवीची चौकशी करण्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने इराणी यांची पदवी बनावट असल्याचा आरोप केला होता. तरीही त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्याने, काँग्रेसने टीका केली होती. आता पंतप्रधान मोदींच्या भावानेच इराणींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रल्हाद मोदी यांनी इतर विषयांवरही बोलताना सांगितले, की ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या भूमिकेतून मदत केली. त्यामुळे हा विषयी वादाचा नाही बनला पाहिजे. परदेशापेक्षा आपल्या देशात सर्वाधिक काळा पैसा आहे. तो सर्वांसमोर आणला पाहिजे. राज्यसभेत सरकारला बहुमत नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सरकार घेऊ शकत नाही.

