हातात नोकरी नाही… पदरात दोन मुलं… त्यांचे शिक्षण कसे करायचे हा प्रश्न… शाळेची फी भरण्यासाठी पैसे हवे होते. ते आणायचे कोठून हा प्रश्न सुटत नसल्यामुळे त्याने घरफोडी करण्याचे ठरवले. हातात कटावणी आणि पहार घेत त्याने बंद घर हेरणे सुरू केले. मात्र पहिल्यांदाच चोरी करत असल्यामुळे पोलिस समोर येताच तो बावरला, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला हेरले आणि त्याच्याकडे हत्यारे सापडल्यामुळे त्याला अटक केली. त्याला अटक केल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळताच त्याच्या पत्नीने दोन मुलांसह पोलिस ठाणे गाठले. त्यांना तोंड कसे दाखवायचे, म्हणून त्याने पोलिस कोठडीतच शर्ट पंख्याला बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही फसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले. मात्र आजही त्याला मुलांच्या शाळा प्रवेशाची चिंता भेडसावतेय.
जितेंद्र नागपुरे (३६) हा पुण्यातील युवक. नोकरी सुटल्यामुळे १५ दिवसांपूर्वी तो भिवंडीत कुटुंबांसह स्थलांतरीत झाला. मुलांची फी भरणे गरजेचे होते. शाळा सुरू झाली, मात्र हातात पैसा नसल्यामुळे त्याचा धीर सुटला. नोकरी मिळवून फी भरेपर्यंत वर्ष वाया जाईल अशी भीती वाटू लागल्यामुळे त्याने घरफोडी करण्याचे ठरवले. मंगळवारी पहाटे कटावणी आणि पहार घेऊन तो बंद घराच्या शोधात निघाला. इतक्यात गस्तीवर चाललेली पोलिसांची गाडी त्याच्यासमोर आली, पोलिसांना पाहताच तो बाबरला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलात उपचार सुरू असल्याचे भिवंडी शहर पोलिसांनी सांगितले.

