भूतान, बांगला देश, नेपाळ आणि म्यानमार या सार्क देशांशी भारताचा रस्त्यांद्वारे संपर्क प्रस्थापित करण्याची मोहीम मार्गी लागल्यामुळे आता नाशिकमधून कांद्याचा ट्रक बांगलादेशात पोहोचू शकेल. सार्क देश एकमेकांशी इतिहास, वारसा आणि संस्कृतीने जोडले गेले असून रस्त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू होणार असल्यामुळे आर्थिक विकासाच्या दिशेने पाऊल टाकले गेले आहे, असे मत भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नाशिकमधून बांगला देशात मोठ्या प्रमाणावर कांदा जातो. कांदा नाशवंत असल्यामुळे त्याची वाहतूक कमीत कमी वेळात होणे आवश्यक असते. सार्क देशांमध्ये करार झाल्यानंतर आता नाशिकहून कांद्याचे ट्रक थेट बांगला देशात पोहोचतील, असे गडकरी म्हणाले. सार्क देशांना रस्त्यांनी जोडण्याचा प्रस्ताव गेल्या २५-३० वर्षांपासून होता. बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार हे देश यात सहभागी झाले असून श्रीलंकेला भारताशी २३ किमी लांबीच्या सागरी भुयारी मार्गाने जोडण्यात येईल. सार्क देशांमध्ये रस्त्यांनी परस्पर संपर्क प्रस्थापित करण्यावर तब्बल आठ अब्ज डॉलर खर्च होणार असून भारताला पावणेचार अब्ज डॉलर खर्च करायचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

