तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? खड्ड्यांमुळं जीव गमावलेल्या जवानाच्या कुटुंबीयांना पोलिसांचा सवाल

मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पुन्हा एका कुटुंबाला पोरके करून गेले. ठाणे अग्निशामक दलातील TDRF जवान विकास गोरे हे बुलेटवरून जात असताना महामार्गावरील मोठ्या खड्ड्यात गाडी आदळली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संकटांचा सामना करावा लागत असतानाच पोलिसांकडूनच असंवेदनशील प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळून ठाणे अग्निशामक दलातील TDRF जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराचा कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कुटुंबीय शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र तिथे पोलिसांनी उलट त्यांनाच सुनावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ‘तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?, असे पोलिस म्हणाल्याचा दावा कुटुंबीय करत आहेत.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी उलट कुटुंबालाच सुनावले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?, असे पोलिसांनी विचारल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय करत आहेत. ठेकेदारांवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही गेलो होतो, पण पोलिस मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एका बाजूला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला. तर दुसऱ्या बाजूला न्याय मागायला गेलेल्या कुटुंबालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एका कर्तव्यदक्ष जवानाचा बळी गेल्यानंतरही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा संवेदनशील नाही का? कुटुंबीयांनी ठेकेदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खड्ड्याने हिरावला आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानाचा जीव

शहापूर-सरलंबा रोडवरील बामणे गावचा 31 वर्षीय विकास लहू गोरे हा तरुण ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत होता. तो नेहमी प्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना मुंबईत-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ एका मोठ्या खड्ड्यात त्याची बुलेट दुचाकी आदळली. दुचाकीचा ताबा सुटून तो डिव्हायडरवर जोरात आपटला. यात तो गंभीर जखमी झाला, येथील नागरीकांनी जखमी अवस्थेत त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदना नंतर नातेवाईकांनी मृत्यु देह ताब्यात घेतला. विकास यांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. विजयच्या पश्चात त्याला 1.3 वर्षांच्या दोन जुळ्या मुली, पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने‌ त्या चिमुरड्या आता पोरक्या झाल्या आहेत. आमच्या विकासचा जीव खड्ड्यामुळेच गेलायं. याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार आहे. आता खड्डा बुजवून काय उपयोग? आमच्या मुलींना बाप परत द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *