रेल्वे स्थानकांमधील मुताऱ्यांच्या स्वच्छतेचा भार पेलवत नसल्याने पुरुषांनाही मुतारीच्या वापरासाठी एक रुपया शुल्क आकारण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण प्रशासनाच्या अंगलट आले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या महत्त्वाच्या स्थानकात ही एक रुपयाची आकारणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांनी गोंधळ घालत ही आकारणी बंद पाडली. रेल्वेने ही स्वच्छतागृहे एक रुपया देऊन वापरण्यालायक बनवावीत आणि त्यानंतरच ही आकारणी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
रेल्वे प्रशासनाने आता सर्वच उपनगरीय स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या वापरासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महिलांसाठी ही प्रसाधनगृहे सशुल्क होती. आता पुरुषांना मुतारीसाठी एक रुपया आणि दीर्घशंकेसाठी पाच रुपये अशी आकारणी सुरू करण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे. याची सुरुवात ठाणे स्थानकापासून करण्यात आली.
सोमवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहासमोरील प्रसानधगृहाचा वापर करण्यासाठी पुरुष प्रवाशांकडून शुल्क आकारणी करण्यास रेल्वेने सुरुवात केली. मध्य रेल्वेने या प्रसाधनगृहाबाहेर एक रुपया शुल्क भरण्याचा फलकही लावला होता. प्रसाधनगृहात कोणतीही सुधारणा किंवा स्वच्छता न करता केवळ शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यामुळे प्रवाशांनी या धोरणाला विरोध करत एक रुपया देण्याचे नाकारले. त्यानंतर संबंधित कंत्राटदार, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. एक रुपया देण्यास आमची ना नाही, मात्र रेल्वेने आधी या प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता राखावी, काही सुधारणा करावी आणि मगच एक रुपया आकारावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. अखेर रेल्वेला नमते घेत ही आकारणी थांबवावी लागली.