येथील बाजारपेठेत यंदा गुळाला चांगला दर असून, आतापर्यंत गतहंगामापेक्षा ५० हजार ६२४ गूळ भेलींची आवक वाढली आहे. भाव चांगला मिळत असल्याने, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक सुरू असून, महिन्याला सरासरी २० हजार भेली कोल्हापुरात येतात.
३० किलो भेलींना क्विंटलमागे सरासरी ४,५०० रुपये, तर एक किलोच्या भेलींना ५,१५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कोल्ड स्टोरेजमधील गूळ संपला आहे.
कोल्हापुरात उत्पादन होणाऱ्या गुळापैकी ९५ टक्के माल गुजरातमध्ये जातो. आॅक्टोबरमध्ये हंगाम सुरू होत असल्याने, गुजरातमधील व्यापारी हंगामातच कोल्ड स्टोरेजलाच गुळाची साठवण करतात. यंदा मात्र, कोल्ड स्टोरेजमधील गूळ
संपल्याने, नवीन गुळाची मागणी वाढली. परिणामी, दर चांगला आहे.
शाहू महाराजांनी वसविली बाजारपेठ कोल्हापुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी १८९५ ला गुळाची बाजारपेठ वसवली. जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक गुऱ्हाळघरे कार्यरत होती, पण साखर कारखान्यांची संख्या वाढत गेल्यानंतर, पाचशे ते सहाशे गुऱ्हाळघरे कार्यरत आहेत. साधारणत:दसऱ्यापासून गुऱ्हाळघरांची धुराडी पेटतात.
गुजरात मार्केटमध्ये गुळाला चांगला भाव असल्याने, यंदा गूळ उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहे. गतवर्षी दर कमी असल्याने, साखर कारखान्यांकडे वळलेला शेतकरी यंदा पुन्हा गुऱ्हाळघरांकडे वळेल.
– मोहन सालपे, उपसचिव, कोल्हापूर बाजार समिती