बातमीचं शीर्षक वाचून तुम्ही चक्रावून गेला असालं. तुमच्या मनात प्रश्न आला असेल हे कसं शक्य आहे. पण वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. हा वैज्ञानिक चमत्कार घडला आहे अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या लीनलीला शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढून पुन्हा गर्भात ठेवले.
त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर लीनलीने इतर बाळांप्रमाणे पुन्हा जन्म घेतला. लीनलीच्या पूर्नजन्माचे संपूर्ण श्रेय जाते टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉक्टर डॅरेल कास यांच्या टीमला. लीनलीची आई मार्गारेट गर्भवती असताना नियमित तपासणीसाठी टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये गेली होती.
एका सोनोग्राफी चाचणीमध्ये डॉक्टरांनी मार्गारेटला लीनलीच्या पाठिला टयुमर असल्याचे सांगितले. त्यावेळी मार्गारेट चार महिन्यांची गर्भवती होती. लीनलीला जो टयुमर होता तो कॉमन प्रकारात मोडणारा होता. पण टयुमरच्या आकरमानामुळे लीनलीचे ह्दय बंद पडून मृत्यू होणार होता.
यामध्ये मार्गारेट समोर फक्त दोनच पर्याय होते एक गर्भपात किंवा गर्भातून बाळाला बाहेर काढून शस्त्रक्रिया. मार्गारेटने दुस-या पर्याय निवडला. त्यानुसार डॉक्टरांनी पाचव्या महिन्यात मार्गारेटच्या गर्भातून लीनलीला बाहेर काढून शस्त्रक्रियेव्दारे टयुमर काढून टाकला व पुन्हा लीनलीला पुन्हा आईच्या गर्भात ठेवले.
पाच तास चाललेल्या या जटील शस्त्रक्रियेत फक्त वीस मिनिटांसाठी लीनलीला आईच्या गर्भातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर नऊ महिन्यांनी दिवस भरल्यानंतर लीनलीचा जन्म झाला. पाचव्या महिन्यात लीनलीला बाहेर काढले तेव्हा तिचे वजन ५३८ ग्रॅम होते. जन्माच्या वेळी लीनलीचे वजन २.४ किलो होते. लीनलीची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांनी लीनलीला तिच्या आईकडे सोपवले.