तापाने फणफणल्यामुळे भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीतर्फे गुरुवारी ‘ट्विटर’वरून ही माहिती देण्यात आली. रैना खेळणार नसला तरी त्याच्या जागी नव्या क्रिकेटपटूची भरती (रिप्लेसमेंट) केली जाणार नसल्याचे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे.
रैनाचे आजारपण गेल्या आठवडयापासूनचे आहे. रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या लढतीत मध्य प्रदेशविरुद्ध फलंदाजीला उतरू शकला नाही. रैनाच्या कर्णधारपदाखालील उत्तर प्रदेशला डावाने मात खावी लागली. दुलीप ट्रॉफीतील थोडया फार उंचावलेल्या कामगिरीने रैनाला वनडे संघात स्थान मिळाले.
या स्पर्धेत त्याने ५२, ३५ आणि ९० धावा केल्या होत्या. तब्बल वर्षभरानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळालेल्या रैनाच्या पुनरागमनाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
मधल्या फळीतील रैना शेवटची वनडे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौ-यातील वनडे मालिका तसेच अमेरिकेत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतही रैनाला स्थान मिळाले नव्हते.
आशिया चषक आणि टी-२० वर्ल्डकपमध्येही त्याला संधीचा फायदा उठवता आला नाही. आशिया चषकातील तीन डावांत ३९ आणि टी-२० वर्ल्डकपमधील चार डावांत सुरेश रैनाला ४१ धावा जमवता आल्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून (१६ ऑक्टोबर) धरमशालामध्ये सुरुवात होत आहे.