आरोग्याला घातक पेयांचा प्रचार करणार नाही -सिंधू

आरोग्याला घातक अशा पेयांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट संकेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने दिले. ऑलिम्पिक पदकानंतर सिंधूसमोर विविध स्तरांतून जाहिराती तसेच विविध उत्पादनांचे सदिच्छादूत होण्यासाठी असंख्य प्रस्ताव आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा उत्पादनाच्या जाहिराती टाळल्याचे सिंधूने सूचित केले.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराच्या ‘श्री श्री आयुर्वेदा’ उपक्रमाच्या ‘ओजस्विता’ या ऊर्जापेयाचे मुंबईत सिंधू आणि राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या हस्ते अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते.

‘‘बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्यासमोरही शीतपेय उत्पादक कंपन्यांनी प्रस्ताव समोर ठेवले होते. मात्र ज्या गोष्टी आरोग्याला चांगल्या नाहीत आणि ज्यांचा उपयोग मी स्वत: करत नाही अशा गोष्टींचा प्रचार करणे टाळले असे गोपीचंद यांनी सांगितले. हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय होता.’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

‘‘ऑलिम्पिक रौप्यपदकाने प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. पदकामुळे देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जबाबदारीची जाणीव आहे. मात्र याचे दडपण न घेता आगामी स्पर्धामध्ये खेळणार आहे. सरावाला सुरुवात केली आहे. शनिवारी डेन्मार्क येथील स्पर्धेसाठी रवाना होत आहे. डेन्मार्कनंतर पॅरिस येथील स्पर्धेतही सहभागी होणार आहे,’’ असे सिंधूने सांगितले. सिंधूसह पदकविजेती साक्षी मलिक आणि ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या दीपा कर्माकर या तिघींना सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्यात आली. मात्र गाडीचा देखभाल खर्च तसेच आगरतळामध्ये रस्त्यांची स्थिती चांगली नसल्याने दीपाने गाडी परत करण्याचा निर्णय घेतला. याविषयी सिंधूला विचारले असता ती म्हणाली, ‘‘दीपाच्या बाबतीत उद्भवलेली समस्या दुर्दैवी आहे. मात्र माझ्याबाबतीत अशी समस्या नाही. गाडी सुरेख आहे आणि ती चालवण्याचा अनुभवही घेतला आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *