चित्रपट कलाकारांचे ग्लॅमर व श्रीमंती आपण पाहत असतो; पण त्यांची मेहनत आपल्याला दिसतेच असे नाही. जन्मतःच हृदयाला छिद्र घेऊन आलेली मधुबाला कोंदट आणि उष्ण स्टुडिओत अवजड साखळदंड किंवा वजनदार भरजरी पोषाख अंगावर घेऊन तासन्तास ‘मुघल-ए-आझम’चे शूटिंग करीत होती. वयस्कर अमिताभ बच्चन ‘पा’साठी पाच पाच तास ‘ऑरो’चे रूप घेण्यासाठी मेकअपला बसत असत. स्टंट दृश्यांपासून भावूक प्रसंगांपर्यंत तन-मनाला थकवणारी मेहनत घेतल्यावर आपण अशा कलाकारांचे पडद्यावरचे रूप पाहत असतो. सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’मधील रणबीर आणि अनुष्का शर्माचे ‘चन्नेया मेरा’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. त्यामधील सोनेरी लहंग्यात खुललेले अनुष्काचे रूप अनेकांना आवडले. मात्र, या लहंग्यानेच तिला शूटिंगवेळी जेरीला आणले! हा लहंगा अतिशय सुंदर होता, यात शंकाच नाही. मात्र, त्याचे वजन होते सतरा किलो! या गाण्याचे शूटिंग ज्या ठिकाणी होत होते तिथे लिफ्ट नव्हती. त्यामुळे अनुष्काला प्रत्येक ब्रेकवेळी हा लहंगा सावरत जीना उतरावा लागे आणि पुन्हा पायर्या चढून वर जावे लागे. तिने दिवसभरात अशा किमान 25-30 येरझार्या मारल्या! अनुष्काने या लहंग्यामुळे झालेल्या त्रासाबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. हा लहंगा तमाम बॉलीवूड नट्यांचा लाडका आणि प्रसिद्ध कॉश्चूम डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. त्याने हा व्हिडीओ पाहून ‘तू मला टॅग केली नाहीस त्याबाबत धन्यवाद’ असे सांगून लहंग्यातील तिच्या रूपाचे कौतुकही केले.