पाक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर

पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्करातील संघर्ष उघड झाला आहे. सरकार-लष्करातील संबंधावर वृत्तांकन करण्यावरही बंदी घातली आहे. पाकमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत आहेत. दहशतवाद आणि मुलकी पातळीवर भारताने केलेली कोंडी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली नाचक्की या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान अस्थिरतेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईत व्याप्त काश्मिरातील 40 दहशतवादी ठार झाले. तर दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त झाले. ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’, ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांचे वास्तव्य व्याप्त काश्मिरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बुरखा फाटला आहे. ‘आयएसआय’ आणि पाक लष्कर दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे उघड झाल्याने पाकची नाचक्की झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडण्याची दाट शक्यता असल्याने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारचेही धाबे दणाणले आहेत. दहशतवाद्यांना पाठीशी घालणार्‍या ‘आयएसआय’ आणि लष्कराला खडेबोल सुनावण्याची वेळ शरीफांवर आली. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर ‘आयएसआय’प्रमुख रिजवान अख्तर यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटविण्याच्या हालचालीही पाकमध्ये सुरू आहेत. लष्करप्रमुख राहिल शरीफ आणि पंतप्रधान शरीफ यांच्यातील गुफ्तगूमुळेही पाकिस्तानमधील सत्तांतराबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.

दरम्यान, सरकार आणि लष्करातील संघर्षाबाबत डॉन या पाकिस्तानी दैनिकात वृत्तांकन करणार्‍या वार्ताहरांवर विदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात कल्पक वृत्त देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शरीफ यांनी दिला आहे.  दरम्यान, डॉन वृत्तपत्राने मात्र सरकार आणि लष्करामध्ये तणाव निर्माण झाल्याचा दावा केला असून संबंधित वृत्तांकन खरे असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *