कोट्यवधी रुपये किमतीची सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे पोलिसांनी शहरातून जप्त केले असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर मारिहाळ आणि जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी दिली.
शेट्टीगल्ली येथील एका घरावर छापा मारून पोलिसांनी प्राण्यांची शिंगे, नखे, सुळे आणि कातडे हस्तगत केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले याला अटक केली आहे. ज्या घरात प्राण्यांची शिंगे, हिस्तदंत आणि अन्य वस्तू ठेवण्यात येत होत्यास त्या घरात भूत असल्याची अफवा गल्लीत पसरविण्यात आली होती. त्यामुळे त्या घराकडे कोणी फिरकत नव्हते. घरात वीज देखील नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे काय चालते. हे कोणालाही समजत नसे. सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगे आणि अन्य वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. नंतर शिंगे, हस्तीदंत, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे आदी कारमधून मुंबईला न्यायचा. तेथून ते चीनला पाठवले जायचे.