अद्ययावत चाचण्यांसाठी भुजबळांना अन्य रुग्णालयात हलवणार?

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नसून अद्ययावत चाचण्यांसाठी त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात ऑर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता तसेच तापही होता आणि त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या पुढील तपासण्या सुरू करण्यात आल्या.

मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्या आणखी काही विशेष चाचण्या कराव्या लागणार आहेत. मात्र जे.जे. रुग्णालयात आवश्यक त्या  सुविधा नसल्यामुळे त्यांना अन्य रुग्णालयात हलवावे लागेल जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितल्याचे समजते. याप्रकरणी रुग्णालयाकडून तुरूंग प्रशासनाला पत्र पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसांतच भुजबळ यांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात येईल असे समजते. तुरूंग प्रशासनाने मात्र असा कोणताही पत्रव्यवहार झाले नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *