गॅसच्या भडक्यात नऊजण जखमी

तालुक्यात दोन वेगवेगळ्या  घटनांमध्ये झालेल्या गॅसच्या भडक्यात 9 जण जखमी झाले. बनवडी व कोपर्डे हवेली येथे शनिवारी रात्री या दोन्ही घटना घडल्या. जखमींना उपचारासाठी सातारा व सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास कोपर्डे हवेली येथील संजय गुंगा भोसले यांच्या राहत्या घरी समाबाई भोसले व मंगल भोसले या स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी तेथे संदेश भोसले व ऋतुराज भोसले बसले होते. यावेळी अचानक गॅसचा प्रवाह वाढला आणि तो सर्व खोलीत पसरला. त्यामध्ये संदेश भोसले, ऋतुराज भोसले, समाबाई भोसले, गणेश भोसले व मंगल भोसले हे भाजल्याने जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी कराडच्या स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे सुविधा उपलब्ध नसल्याने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठविण्यात आले.

दरम्यान, शनिवारी रात्री एकच्या सुमारास बनवडी येथे रस्त्यालगत असलेल्या प्रसाद रेसीडेंसी मधील फ्लॅट नंबर एस 13 मध्ये राहत असलेल्या प्रा.उमाकांत भेसके यांच्या बाथरुममध्ये असलेल्या गॅस गिझरमधून गॅस लिक झाला. फ्लॅटचे सर्व खिडक्या आणि दारे बंद असल्याने गॅस आतच कोंडून तो पसरत देव्हार्‍यापर्यंत गेला. देव्हार्‍यामध्ये लावलेल्या निरंजन पर्यंत गॅस पोहचल्याने गॅसचा भडका झाला. यामध्ये उमाकांत प्रा. भेसके हे जखमी झाले व त्यांच्या हातांना जखमा झाल्या. तर त्यांची पत्नी आणि दोन मुले हे किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *