ब्रह्मपुत्रा नदीची उपनदीचे पाणी अडवून तेथे प्रकल्प उभारल्यामुळे भारताला कोणत्याही परिणामांना सामोरे जावे लागणार नाही, असा खुलासा चीनने केला आहे. वास्तविक, ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी शियाबुकूवर लाल्हो नामक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी चीनने नदीचे पाणी अडवले आहे. त्यामुळे याचा परिणाम ईशान्य भारतातील राज्यावर पडणार आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिब्बत, अरुणाचल प्रदेश आणि आसाम, बांग्लादेशातून वाहते.
शियाबुकू नदीला येथील स्थानिक लोक यारलुंग जंगबू या नावाने संबोधतात. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी चीनच्या प्रदेशांतर्गत येते, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
ब्रह्मपुत्रा नदी तिब्बत, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहत बांग्लादेशातून पोहोचते. चीनने जर नदीचे पाणी अडवले तर या राज्यांमध्ये पाण्याची समस्या उद्भवेल. ब्रह्मपुत्रा नदीवर प्रकल्प बनवण्यासाठी भारत-चीन द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय समझोता करण्यात आलेला नाही.
प्रकल्प उभारुन चीन अरुणाचल प्रदेश आपलाच असल्याचा दावा करु शकतो. यापुर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशाकडे जाणार्या मार्गावर रस्ते बांधले आहेत तसेच चीन सैन्य भारतीय भूमीत घुसखोरी करत आहे.
सिक्किमनजीक जिगेज शहरमध्ये जियाबुकु नदीवर चीन लाल्हाो नामक प्रकल्प उभारत आहे. १९५ किमी. लांबीची ही नदी तिब्बतमधील बैनांग येथून निघून उत्तर दिशेने वाहत ती यारलुंग जाबोंग नदी म्हणजेच ब्रह्मपुत्रेला मिळते.
यापुर्वीच चीनने रेल्वे लाईन करण्यापासून धरणे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. जिगेज शहर सिक्किम आणि भूतानपासून काही तासांच्या अंतरावर आहे. जिगेज शहरातूनच नेपालपर्यंत रेल्वेलाइन करण्याच्या प्रयत्नात चीन आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या वरील भागात चीनने २०१०मध्ये जांग्मू धरण उभारले होते. दागू, जियाचा आणि जिक्सू या आणखी तीन छोट्या धरणांचे काम सुरु आहे. तर २०१५ मध्ये चीनने तिब्बतमध्ये जैम हाइड्रो पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटनही केले होते.
