सांगलीच्या मिरजमध्ये महावितरणच्या सब स्टेशनमध्ये घुसून महावितरणच्या ऑपरेटरचा डोक्यात रॉड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडलीये. सुधीर लाटवडे असे खून झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित वॉचमनच्या मुलाला पोलिसांनी अटक केलीये.
नेमकी घटना काय?
सुधीर लाटवडे हे मिरजेतील महावितरणच्या सब स्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत होते. तर याच ठिकाणी खासगी कंपनीचा एक वॉचमन देखील काम करीत होता. वॉचमन सब स्टेशनमध्ये रोज त्याची दुचाकी चार्जिंग करीत असल्याने सुधीर लाटवडे यांनी वॉचमनच्या सुपरवायजरकडे त्याची तक्रार केली होती. यातून दोघांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित वॉचमनची सबस्टेशनमधून बदली करण्यात आली होती. तर त्या ठिकाणी दुसरा वॉचमन नियुक्त करण्यात आला होता.
सबस्टेशनमध्ये घुसून हत्या
काल बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नव्याने नियुक्त केलेला वॉचमन हॉटेलमधून जेवणाचा डबा आणण्यासाठी गेल्याने सुधीर लाटवडे हे ऑपरेटर महावितरणच्या सबस्टेशनमध्ये एकटेच होते. याचदरम्यान संबंधित वॉचमनचा मुलगा सौरभ निकम सबस्टेशनमध्ये घुसला. त्यानंतर वडिलांसोबत झालेल्या वादाच्या रागातून त्याने ऑपरेटर सुधीर लाटवडे यांचा निर्घृणपणे खून केला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर एका तासाच्या आतच सौरभ निकम याला पोलिसांनी अटक केलीये. या घटनेमुळे मात्र खळबळ उडालीये.
शहरात वर्चस्वाच्या कारणावरुन रस्सीखेच
15 दिवसांपूर्वीच हत्येची एक घटना शहरात घडली होती. सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. गुंड लखन इसरडे याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांनी हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरु होतं. चेतन तोरणे (वय 19, रा. टिम्बर एरिया वसाहत, सांगली) असं मृत तरुणाचं नाव आहे. संशयित इसरडे आणि मृत चेतन तोरणे एकेकाळी मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर तोरणे त्याची टोळी बनवत होता.
