आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट

आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून राजस्थानमधील त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक चारमध्ये राहणारा सोहिल संगवान (२०) हा विद्यार्थी मटेरियल सायन्स इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. मूळचा राजस्थानमधील पिलानी येथे राहणारा सोहिल चारच दिवसांपूर्वी घरून संस्थेत परतला होता. मंगळवारी रात्री त्याच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला जात नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी संस्था प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून खोली उघडली असता, सोहिलने गळफास घेतल्याचे आढळले.

याबाबत प्रशासनाने पवई पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यावर पवई पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३मधील कलम १९४नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विद्यार्थ्याने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आढळलेली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी सोहिलच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यावर छत्तीसगड येथे राहणारे त्याचे मामा राजिंदर रात्रीच मुंबईत पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री वसतिगृह क्रमांक चारमधील अनेक विद्यार्थी इमारतीबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी या घटनेबाबत संस्थेच्या प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

यापूर्वी फेब्रुवारीमध्येही आयआयटी मुंबईतील दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध समुपदेशन आणि मानसिक आरोग्यविषयक सुविधांची माहिती पुन्हा दिली होती. तणाव किंवा भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक समुपदेशनासह उपलब्ध मदत यंत्रणांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *