पाकव्याप्त काश्मीरात भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद संसदेवर हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. एका इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर भारतीय संसदेवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची कुणकुण भारतील लष्कराला लागली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन देशभरातील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
१८ सप्टेंबरला झालेल्या उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने २७ सप्टेंबरच्या मध्य रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. आता याच पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून बदला घेतला जाणार असल्याची आणि भारतात मोठा घातपात घडविणार असल्याची शक्यता गुप्तचर संघटनांनी वर्तवली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांनी आतापर्यंत काश्मीरमधील बारामुल्ला आणि हंदवाडा येथील लष्करी तळांवर हल्ले केले. मात्र भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
उरी दहशतवादी हल्ला, तसेच १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि तिचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा हात होता.
