भारतीय जवानांनी ‘संपुआ’ सरकारच्या काळात पाकव्याप्त काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करत 13 सैनिकांचा खात्मा केला होता, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडातील गुगलधर रिज येथील लष्करी तळावर हल्ला करून दोन भारतीय जवानांचे शिर नेले होते. याचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 13 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करून तिघांचे शिर कलम करून आणण्यात आले होते, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
कुपवाडा लष्करी तळाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या निवृत्त मेजर जनरल एस. के. चक्रवर्ती यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. आजवर भारतीय जवानांनी केलेल्या धाडसी कारवायांपैकी एक, असे या सर्जिकल स्ट्राईकला चक्रवर्ती यांनी संबोधले आहे.
दरम्यान, पाकच्या या कृत्याचा बदला घेण्यासाठीच सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला ‘ऑपरेशन जिंजर’ असे नाव देण्यात आले. व्याप्त काश्मिरात घुसण्याआधी सातवेळा रेकी करण्यात आली होती. सुमारे दोन महिने रेकी करून लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर 30 ऑगस्ट 2011 रोजी ‘ऑपरेशन जिंजर’ सुरू करण्यात आले. जाणीवपूर्वक मंगळवारीच हे ऑपरेशन करण्यात आले. कारण कारगिल युद्धासह मंगळवारी सुरू झालेल्या युद्ध आणि कारवायांमध्ये भारताने पाकला सहज धूळ चारली होती, असेही या वृत्तात म्हटले आहे. या कारवाईत 13 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करून तीन सैनिकांचे शिर कलम करून भारतीय जवानांनी आणले होते, असा दावा या वृत्तात चक्रवर्ती यांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.
