सणासुदीत सोने झाले स्वस्त

फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीय केंद्रीय बॅंकेची व्याजदर वाढीची भीती आणि मागणी रोडावल्याने बुधवारी (ता.5) सराफ बाजारात सोने, चांदीची चमक फिकी पडली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 760 रुपयांनी घसरला. त्याचबरोबर चांदीदेखील तब्बल 1785 रुपयांनी स्वस्त झाली. यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना खरेदीची नवी संधी चालून आली आहे.

नवी दिल्ली आणि मुंबईतील सराफ बाजारात सोन्याचा भाव 760 रुपयांनी कमी झाला. तो 30 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. चालू वर्षात सोन्यातील भावाची एका दिवसातील मोठी घसरण आहे. त्याचबरोबर चांदीतही 1785 रुपयांची घट झाली असून, प्रतिकिलो चांदीचा दर 43205 रुपयांपर्यंत खाली आला. सराफ स्वस्ताईने ग्राहकांच्या आशा पल्लवीत केल्या असून, जागतिक घडामोडी पाहता भाव आणखी कमी होण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक बाजारात सोने 1300 डॉलरची (प्रतिऔंस) पातळी खाली आले. न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव 3.26 टक्‍क्‍यांनी घसरून 1268.40 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. तसेच चांदीच्या किमतीत 5.38 टक्‍क्‍यांनी घट झाली आणि भाव 17.78 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. मंगळवारी (ता.4) देखील सोने 135 रुपयांनी आणि चांदी प्रतिकिलोमागे 875 रुपयांनी स्वस्त झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *