शिवना- धोत्रा रस्त्यावरील श्री.अष्टविनायक गणपती मंदिर संस्थानचे पिठाधीश महंत मौनीगिरी महाराज यांचे गुरुवारी (ता.०६) संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेह व मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. राज्यभरात त्यांचे शिष्यगण आहेत. दिवंगत मौनी महाराजांचे गुरु तथा अंबॠषी संस्थानचे पिठाधीश महंत कृष्णगिरी महाराज यांनी ही माहिती दिली.
सिल्लोड तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या धोत्रा येथील श्री. क्षेत्र सिद्धेश्वर महाराज संस्थानवर अनेक वर्षांच्या वास्तव्यानंतर मौनी महाराजांनी धोंडखेडा चौफुलीवर अष्टविनायक गणपती मंदिराची उभारणी केली. हे संस्थान अल्पावधीतच प्रसिध्दीला आले. महाराजांना मानणारा शिष्यवर्ग औरंगाबाद व पैठणसह राज्यभरात विखुरलेला आहे. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला संस्थानवर होणार्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच्या आजाराने महाराजांची प्रकृती खालावल्याने ते वैद्यकिय उपचारांनाही प्रतिसाद देत नव्हते. वृद्धापकाळ व गंभीर आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (ता.०७) दुपारी त्यांच्यावर अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती अष्टविनायक मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष भिमराव नाना काळे यांनी दिली.