राष्ट्रीय तपास संस्थेने तमीळनाडू येथील तिरुनवेली येथून अटक केलेल्या आयएसआयएसचा (इसिस) संशयित हस्तक सुबहानी हाजा मोईद्दीन याने इराकनजीक बैजी या प्रांतात आयएसआयएसच्यावतीन युद्धात भाग घेतला असल्याचे उघडकीस आले आहे. युद्धात भाग घेतलेल्या दहशतवाद्यांना आयएसआयएस दरमहा १०० डॉलर इतके मानधन देत असे या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
सुबहानी याने प्रत्यक्षात आयएसआयएससमवेत युद्धातच भाग घेतला असल्याने त्याच्याकडून या दहशतवादी संघटनेच्या कार्यपद्धतीवर महत्त्वाची माहिती मिळू शकले असे राष्ट्रीय तपास संस्थेला वाटते.
भारतात घातपाती करावाया करण्याचे त्याचे नियोजन होते, असे ही चौकशीतून निष्पन्न झाले आहे. सुबहानी गेल्यावर्षी चेन्नईतून इस्तंबूलकडे गेला होता. तेथून तो सिरियात आयएसआयएसमध्ये भरती झाला होता. तेथे त्याला धार्मिक आणि लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्याला युद्धासाठी पाठवण्यात आले. त्याने २ आठवडे युद्धात भाग घेतला होता, असे चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वी तो भारतात परत आला. भारतात आल्यानंतर आयएसआयएसच्या हँडलरशी तो संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरून तो भारतात घातपाती कारवाया करणार होता.