बेकायदेशीररीत्या पिस्तुले विकण्यास निघालेल्या दोघांना मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण चौकात अटक केली असून, त्यांच्याकडून 5 पिस्तुलांसह 11 जिवंत काडतुसे फरासखाना पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे. दरम्यान, अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
पद्मा शिवाजी जाधव (30, रा. सर्व्हे नं. 48, कात्रज-कोंढवा रोड, गोकुळ नगर) आणि इफ्तीकार मुश्ताक अत्तार (25, रा. मुपो. अवसरी बुद्रुक मंचर, ता. खेड. मूळ रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी हे पिस्तुले विक्री करण्यासाठी मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण चौकातून जात असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सागर केकाण यांना मिळाली. उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंके, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण, जयराम पायगुडे, तपास पथकाचे प्रमुख आणि सहाय्यक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी ईकबाल शेख, ज्ञानेश्वर देवकर, बापु खुटवड, संजय गायकवाड, विनायक शिंदे, संदिप पाटील, बाबासाहेब गोरे, शंकर कुंभार, अमोल सरडे, विकास बोर्हाडे, सागर केकाण, अमेय रसाळ आणि हर्षल शिंदे यांच्या पथकाने श्रीकृष्ण चौकात सापळा रचला. त्यावेळी आरोपी जाधव आणि अत्तार हे दोघे दुचाकीवरून जात असताना त्यांना आढळून आले. पोलिस पथकाने त्यांना थांबविले आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. आरोपींकडे दुचाकीच्या डिक्कीत 3 पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी ती जप्त केली. तर अत्तार याच्याकडे 2 पिस्तुले आणि 3 काडतुसे आढळून आली. पोलिसांनी एकुण 5 पिस्तुले आणि 11 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. अत्तारने त्याच्या ओळखीचा असलेल्या फारूख (रा. मध्यप्रदेश) याच्याकडून पिस्तुले आणि काडतुसे विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. पोलिस फारूकचा शोध घेत आहेत.