हरियाणातील पशुंची नेहमीच चर्चा होत असते. तेथील म्हशी, रेडे आणि गायींचा देशभर नावलौकिक आहे. आता तेथील एका जर्सी गायीने लक्ष वेधून घेतले आहे. करनाल जिल्ह्यातील ही गाय दिवसाकाठी साठ लिटर दूध देते. सरासरी काढली तर ती दर तासाला अडीच लिटर दूध देत आहे.
करनालच्या दादूपूर गावातील डेअरी संचालक कुलदीप यांनी या गायीचे नाव जॅकाब ठेवले आहे. 25 वर्षांच्या कुलदीप यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. या गायीने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचे पुरस्कार मिळवले आहेत. तिच्या दुधाच्या विक्रीतून कुुटुंबाला मोठाच फायदा मिळत आहे. त्यामुळे ही गाय विकण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. ही गाय ‘होल्सटीन फ्रोजन’ या हॉलंडच्या जातीची आहे. अमेरिकेतून उत्तम दर्जाच्या बैलाचे वीर्य आणवून कृत्रिम मार्गाने तिच्या मातेचे प्रजनन घडवून आणण्यात आले होते. ही गाय दिवसाकाठी 30-35 किलो हिरवा चारा, दहा किलो पेंड, दहा किलो गाजर, पाच किलो हरभरे खाते. तिला काही हंगामी भाज्याही खाण्यास दिल्या जातात.