बंगळुरुमधील एका वैज्ञानिकाला आणि त्याच्या पत्नीला अॅमफेटामाइन ड्रग्स बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दांम्पत्याकडून अंमलीपदार्थ विरोधी शाखेच्या पोलिसांनी तब्बल २३१ किलो अॅमफेटामाइन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या अॅमफेटामाइनची किंमत २३१ कोटी रुपये आहे.
वेंकट रामा राव (३७) असे अटक केलेल्या वैज्ञानिकाचे नाव आहे. अंमलीपदार्थ विरोधी शाखेने केलेली ही कारवाई आहे. भारतातून दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकी देशांमध्ये या ड्रग्सची मोठया प्रमाणावर तस्करी होते. ३० सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये ड्रग्स ताब्यात घेत असताना वेंकट रामा रावला (३७) पोलिसांनी अटक केली.
पोलिसांना वेंकटकडे २२१ किलो ड्रग्स सापडले. चौकशीत त्याने घरी आणखी ड्रग्स असल्याचे सांगितले. अंमलीपदार्थ विरोधी शाखेने वेंकटच्या घरावर छापा मारला तेव्हा तिथे ३० किलो अॅमफेटामाइन सापडले. वेंकटची पत्नी प्रिती(३५) हे ड्रग्स लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. घरात सापडलेले ड्रग्स नमुन्यासाठी म्हणून ते ग्राहकांना दाखवत असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
घरात सापडलेल्या ड्रग्सची बाजारभावानुसार किंमत १.२३ कोटी आहे. पोलिसांनी प्रितीलाही अटक केली. प्रयोगशाळेमधून पोलिसांनी १० किलो ड्रग्स जप्त केले. प्रयोगशाळेमध्ये या ड्रग्सवर प्रक्रिया केली जायची.