बीपीटी कॉलनीत घाणीचे साम्राज्य

वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना सध्या साचलेल्या पाण्याचा आणि वाढलेल्या रानझाडांचा त्रास सहन करावा लागत आहे. वसाहतीतील अनेक इमारतींसमोर पावसाचे पाणी साचून राहिल्याने डेंग्यूसदृश डासांच्या अळ्याची पदास होण्याची भीती रहिवाशांना वाटते आहे.

डेंग्यूची लागण होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पदास ही साचलेल्या आणि प्रवाहित नसलेल्या पाण्यातच होते. वडाळा पूर्वेला असणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत सध्या पावसाचे पाणी इमारतींसमोर साठून राहिले आहे. त्यात डेंग्यूच्या डासांची पदास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यामधून वाहून जात नाही. ते तिथेच तीन-चार दिवस साचून राहते. वसाहतीतील २९ क्रमांक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना या साचलेल्या पाण्याचा त्रास सर्वाधिक जाणवतो आहे.

पावसाच्या दिवसातही इमारतीसमोर ६-७ इंच पाणी सहा-सात दिवस साचून राहते. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. केवळ साचलेल्या पाण्याचे छायाचित्र काढून घेतले जाते, अशी माहिती तेथील एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या शिवाय या परिसरात मोठय़ा प्रमाणावर रानगवत माजले आहे.या वसाहतीतील कित्येक इमारतींची अवस्था राहण्याजोगीही नाही. दुरुस्ती न केल्यामुळे काही बंद खोल्यांच्या छतामधून पाण्याची गळती होत राहते. ते पाणी या खोल्यांमध्ये साचून राहते. यावर प्रशासन काही उपाययोजना करत नसल्याने रहिवासीच अशा कुलूपबंद खोल्यांच्या छताला प्लास्टिकच्या ताडपत्री लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *