नवर्यासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विवाहितेची तिच्या पतीसोबत भेट घडविण्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकामधील लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले. व्हॉटस् अॅप वर पाठविलेल्या छायाचित्रामुळे या महिलेला शोधण्यात यश मिळाल्याची माहिती हवालदार रवींद्र पाटील यांनी दिली.
पतीसोबत किरकोळ कारणाने भांडण झाल्याने संतापलेली महिला रागाने घराबाहेर पडली होती. कामायानी एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकात आली अयश्रसता त्यातुन संबंधित महिलेस ताब्यात घेण्यात आले. व्हॉटस अॅपच्या सहाय्याने पाठविल्या छायात्रिवरुन महिलेचा शोध घेणे शक्य झाले आहे. वंदना मधुगन तिवारी वय 25, रा. दिनबंधूनगर, जयमहाराष्ट्र गल्ली, वडाळा, मुंबई असे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी (दि.1) वंदना तिवारी आणि तिचा पती मधुगन अशोक तिवारी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. रागाच्या भरात वंदना तिवारी पतीला काहीएक न सांगता घराबाहेर पडल्या.
सायंकाळपर्यंत वंदना घरी न आल्याने पतीने वडाळा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. वडाळा पोलिसांनी याबाबतची सविस्तर माहिती नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांना दिली. व्हॉटस् अॅपवर संबंधित महिलेचे छायाचित्र नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर ही महिला कामायानी एक्सप्रेसने मध्यप्रदेश येथील सतना येथे जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याप्रमाणे नाशिकरोड लोहमार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रविंद्र पाटील, सहायक उपनिरीक्षक विष्णु भोये यांनी महिला कॉन्स्टेबल सुजाता निचड, हवालदार बेबिताई गायकवाड, पोलीस नाईक जयश्री साळवे आदी कर्मचार्यांना सोबत घेतले. कामायानी एक्सप्रेसमधील कोच क्रमांक पाचमधील बर्थ नंबर सातवर बसलेल्या महिलेशी वंदना यांचे वर्णन मिळतेजुळते असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान वंदना यांनी आपले नाव सांगितल्याने पोलिसांची खात्री पटल्यावर त्यांनी वंदना यांना रेल्वेतुन उतरण्याची विनंती केली, मात्र तिवारी यांनी नकार दिल्याने महिला कॉन्स्टेबलच्या सहाय्याने त्यांना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. यानंतर वडाळा पोलीस ठाणे येथे संबंधित माहिती कळविण्यात आली. यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या मधुगन तिवारी यांच्यासोबत वंदना यांची भेट लोहमार्ग पोलिसांनी धडवून आणली. लोहमार्ग पोलिसांनी एक संसार वाचविल्याची समाधानकारक चर्चा उपस्थितांमध्ये होती.