दावणीचे बैल विक्रीला! चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांवर वेळ, गोरक्षकांच्या सतर्कतेनं जनावरांची सुटका

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सात पिकअप वाहनांतून दाटीवाटीने वाहून नेल्या जाणाऱ्या १६ गोवंशीय बैलांची नाशिकरोड पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी आणि पळसे गावाजवळील फुलेनगर येथील राममंदिर परिसरात रविवारी सकाळी साडेसात वाजता करण्यात आली. पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे.

या सर्व बैलांची वाहतूक पेठ, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांतून सिन्नर येथील बाजारात विक्रीसाठी केली जात असल्याचे बैलांच्या मालकांनी सांगितले. मात्र, ही वाहतूक बेकायदेशीरपणे केली जात असल्याचा संशय गोरक्षकांना होता. आदित्य फडोळ, रोहित मोरे, साहिल पिलोरे आणि दर्शन देवरे या गोरक्षकांनी ही वाहने अडवून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यातील रात्र गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात पिकअप वाहने आणि त्यातील १६ बैल ताब्यात घेतले. त्यानंतर ही वाहने आणि बैल नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस शिपाई नितीन सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ११ संशयितांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर फाटा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार अनिल मोरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *