घरकामासाठी मोलकरीण किंवा मदतनीस ऑनलाइन ॲप आणि संकेतस्थळांवरून बोलावणे सोयीचे झाले असले, तरी संबंधित व्यक्तीची योग्य पडताळणी न केल्यास चोरीसारख्या घटनांना सामोरे जावे लागू शकते. मुंबईत घरकामासाठी आलेल्या महिलांनी मौल्यवान वस्तू चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
खार येथील एका कुटुंबाने एका ॲपवरून घरकामासाठी महिलेचे बुकिंग केले होते. संबंधित महिला घरी येऊन काम पूर्ण करून गेली. मात्र, काही वेळाने घरात कोणीही नसताना तिने पुन्हा घरात प्रवेश केला आणि सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्याचा आरोप आहे. ॲपवरील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खार पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. सायली पवार असे तिचे नाव असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तिला सांताक्रूझ येथून अटक केली.
ॲपवरून घरकामासाठी बोलावताना ही काळजी घ्या
वापरत असलेले ॲपअधिकृत आणि नोंदणीकृत कंपनीचे आहे का, याची खात्री करा
ॲपवरील तसेच इतर विश्वसनीय ठिकाणांवरील ग्राहकांचे अभिप्राय आणि गुणांकन तपासा
संबंधित मदतनीसाचे ओळखपत्र आणि पत्त्याची पडताळणी कंपनीने केली आहे का, याची विचारणा करा
मदतनिसाची पोलिस पडताळणी झाली आहे का, हे संबंधित कंपनीकडून तपासून घ्या
मदतनिसाला कायमस्वरूपी कामावर ठेवणार असल्यास स्थानिक पोलिसांकडे आवश्यक माहिती नोंदवा
मदतनिसाने यापूर्वी कुठे काम केले आहे, याची माहिती घ्या आणि शक्य असल्यास संदर्भ तपासा
कोणती कामे करायची आहेत, कामाची वेळ किती असेल आणि मोबदला किती असेल, हे आधीच ठरवा
घराच्या मुख्य प्रवेशद्वारासह आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा विचार करा
शक्यतो नवीन मदतनीस घरात काम करत असताना घरातील एखादी जबाबदार व्यक्ती उपस्थित ठेवा
कपाटांच्या चाव्या, दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवू नका
