देशभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा केंद्रीय वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील मुबलक पावसाची शक्यताही वास्तवात उतरली आहे. राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून गेल्यावर्षी पेक्षा 20 टक्के पाऊस अधिक पडल्याची नोंद वेधशाळेने केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा 106 इंच पाऊस पडणार असे सांगितले होते. परंतु दि.1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत 116.41 इंच एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात पेडणे येथे सर्वाधिक 136.1 इंच तर केपे येथे सर्वांत कमी 104.4 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात जून, जुलै महिन्यांत मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टमधील आठ-नऊ दिवस वगळता पाऊस थोडा कमी होता. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण कमीच दिसून आले. दि.14 सप्टेंबरनंतर बारा ते तेरा दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सरांसरीत 4 टक्के वाढ झाली.
गेल्यावर्षीच्या तुलनेत गोव्यात यंदा पावसाची समाधानकारक स्थिती आहे. अल निनोच्या प्रभावामुळे 2015 च्या हंगामात 96 इंच पाऊस पडला होता. परंतु यंदा पाऊस योग्य प्रमाणात पडला असल्याचे गोवा वेधशाळेचे अधिकारी एन हरिदासन यांनी सांगितले.