एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्या युवकास गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पुरुषोत्तम उर्फ महागू मारोती कोकोडे(26) रा.घाटी ता.कुरखेडा असे दोषी युवकाचे नाव आहे.
12 ते 17 जानेवारी 2013 दरम्यान पीडित मुलगी ही आपल्या बहिणीकडे घाटी येथे पाहुणी म्हणून आली होती. यावेळी पुरुषोत्तम कोकोडे याने तिच्याशी सलगी साधून व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती गर्भवती राहिली व 27 सप्टेंबर 2013 रोजी तिने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर पीडित मुलीने पुरुषोत्तमला लग्न करण्याची विनंती केली. मात्र त्याने ती धुडकावून लावली. यामुळे पीडित मुलीने दुसर्या दिवशी लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण कुरखेडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलिसांनी पुरुषोत्तम कोकोडे याच्यावर भादंवि कलम 376(आय), 417 व बालकाच्या लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलिस अधिकारी एस.एस.शेजाळ यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायाधीश-वर्ग 1 यू.एम.पदवाड यांनी सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद व जनुकीय विश्लेषणाचा अहवाल ग्राह्य मानून आरोपी पुरुषोत्तम कोकोडे यास कलम 376 अन्वये 7 वर्षांचा सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.