भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे देशातील सर्वात मोठी कुबेरनगरी ठरली आहे. मुंबईत पैशाची खाण असल्याचे दिसत असून शहरात ४५ हजार कोटय़धीश व २८ अब्जाधीश राहत असून त्यांची एकत्रित संपत्ती ८२० अब्ज डॉलर्स आहे.
‘द वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. मुंबईपाठोपाठ दिल्ली व बंगळुरू या शहरात श्रीमंतांची संख्या अधिक आहे. ही सर्व संपत्ती वैयक्तिक आहे. यात मालमत्ता, रोख रक्कम, समभाग, व्यावसायिक हितसंबंध आदींचा संपत्तीत समावेश आहे.
१० लाख डॉलर्सपेक्षा अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या दशलक्षाधीश तर एक अब्ज डॉलर्सपेक्षा वैयक्तिक संपत्ती असलेल्यांना अब्जाधीश अशा पद्धतीने वर्गीकरण केले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत २२ हजार कोटय़धीश राहत असून १८ अब्जाधीश राहतात. त्यांची एकत्रित संपत्ती ४५० अब्ज डॉलर्स आहे. बंगळुरूत ७५०० कोटय़धीश असून ८ अब्जाधीश राहतात. त्यांची एकत्रित संपत्ती ३२० अब्ज डॉलर्स आहे.
भारतात जून २०१६ पर्यंत २ लाख ६४ हजार कोटय़धीश असून ९५ अब्जाधीश आहेत. मोठया शहरांबरोबरच सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंदीगड, जयपूर, वडोदरा आदी शहरांमध्येही श्रीमंतांची संख्या वाढत आहे, असे या अहवालात नमूद केले.
येत्या दशकात भारतातील वित्त क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम व्यवसाय, आरोग्य व प्रसारमाध्यमांचा विकास होणार आहे. विशेष करून स्थानिक रुग्णालय सेवा व आरोग्य विमा क्षेत्राचा विकास अधिक प्रमाणात होईल. हैदराबाद, पुणे व बंगळुरू शहरात संपत्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हैद्राबाद (३१० अब्ज डॉलर्स, ८२०० कोटय़धीश, ७ अब्जाधीश), कोलकाता (२९० अब्ज डॉलर्स, ८६०० कोटय़धीश, १० अब्जाधीश), पुणे (१८० अब्ज डॉलर्स, ३९०० कोटय़धीश, ५ अब्जाधीश), चेन्नई (१५० अब्ज डॉलर्स, ६२०० कोटय़धीश, ४ अब्जाधीश), गुरगाव (११० अब्ज डॉलर्स, ३६०० कोटयधीश, २ अब्जाधीश)
