मराठवाडयाची तहान भागली!

मराठवाडयाची तहान भागली!

तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडयावर यंदा वरुणराजाने चांगली कृपादृष्टी केली आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे या विभागाने सहा वर्षात दुस-यांदा सरासरी गाठली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आली असून, त्यामुळे रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र वाढणार आहे.

तीन वर्षांपासून मराठवाडयाकडे पावसाने पाठ फिरवली होती. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाडयात आतापर्यंत सरासरी ९९.६७ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाडयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७७९ मि.मी. इतके आहे. त्या तुलनेत विभागात आतापर्यंत ७७६ मि.मी. पाऊस झाला आहे. १३ वर्षांत २०१० हे मराठवाडयात सर्वाधिक पावसाचे वर्ष राहिले. तेव्हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाला होता.

त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा विभागात मोठी तूट होती. २०१३मध्ये ११० टक्के पाऊस झाला. पुढची दोन वर्षे पुन्हा सरासरी केवळ ५० ते ५५ टक्के एवढाच पाऊस झाला.विभागात रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र २० लाख ७७ हजार हेक्टर एवढे आहे.

दोन वर्षात अपु-या पावसामुळे त्यातील निम्म्या क्षेत्रावरही पेरा झाला नव्हता. यंदा हे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत रब्बीचे क्षेत्र ८ लाख ६४ हजार एवढे आहे. ते ८ लाख ९९ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *