जगात वाढत्या वायू प्रदूषणामुळे जगातील ९० टक्के नागरिकांचा श्वास प्रदूषित झाला आहे, असा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वायू प्रदूषणावर वेळीच उपाययोजना न केल्यास जगात दरवर्षी ६० लाख जण दगावतील, असा इशाराही संघटनेने दिला.
संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विभागाच्या प्रमुख मारिया नायरा म्हणाल्या की, वायू प्रदूषणाबाबतची नवीन माहिती चिंताजनक आहे.
शहरांमध्ये वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून ग्रामीण भागातील वातावरणही चिंताजनक आहे. श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांमधील हवा अधिक प्रदूषित आहे. मात्र, प्रदूषणाचा फटका सर्वच देशांना बसत आहे. आरोग्य आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांनी भागणारे नाही. रस्त्यावर वाहनांची संख्या, कचरा व्यवस्थापनात सुधारणा आणि भोजनासाठी स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण-पूर्व आशिया, चीन, दक्षिण आशियातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. या वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ६ लाख तर बांगलादेशात ३७ हजार जणांना प्राणाला मुकावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला. जगातील तीन हजार ठिकाणचा अभ्यास करून हा अहवाल बनवला आहे.
जगातील ९२ टक्के जनता ही अत्यंत खराब वायू प्रदूषण असलेल्या भागात राहते. जागतिक आरोग्य संघटनेने निकषांपेक्षाही या भागातील प्रदूषण अधिक आहे, असे नायरा यांनी सांगितले.
वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना
» रस्त्यावर गाडया कमी कराव्यात
» कचरा व्यवस्थापन सुधारावे
» भोजन बनवण्यासाठी स्वच्छ इंधनाचा वापर
