मुंबई अंतिम फेरीत दाखल

मुंबई अंतिम फेरीत दाखल

घरच्याच मैदानावर बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाला पुन्हा एकदा पराभवाचे पाणी पाजत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीला विजयाची पायाभरणी केली तर गोलंदाजांनी त्यावर कळस चढविला.

प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई संघाने चेन्नईसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र त्यांचा डाव १६२ धावांतच संपुष्टात आला.

विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाला शून्य धावसंख्येवरच पहिला धक्का बसला तो ड्वायेन स्मिथच्या रुपाने. मलिंगाच्या गोलंदाजीवर तो भोपळा न फोडता परतला. त्यानंतर रैना, फा फु डेप्लेसिस यांनी चेन्नईच्या धावसंख्येला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला.

प्लेसिसने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर रैनाने २५ धावा केल्या. हरभजन सिंगने रैना आणि महेंद्र सिंग धोनी हे दोन महत्त्वाचे बाद केले. धोनी शून्यावर बाद झाला. ड्वायेन ब्राव्होने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा अडसरही मॅक्लेघनने दूर केला. एका ठराविक अंतराने चेन्नईचे फलंदाज बाद होत गेले आणि १६२ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. मुंबईच्या लसिथ मलिंगाने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर हरभजन सिंग आणि विनय कुमारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Mumbai: Mumbai Indians' players celebrates the victory over Chennai Super Kings during the first qualifier match of IPL in Mumbai on Tuesday. PTI Photo by Mitesh Bhuvad(PTI5_20_2015_000002A)

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. हैदराबादविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात लिंडेल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांनी ९० धावांची दमदार सलामी दिली. सिमन्सने ५१ चेंडूत ६५ धावा केल्या. तर पार्थिवने २५ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. किरेन पोलार्डनेही अवघ्या १७ चेंडूत ४१ धावांची शानदार खेळी केली. यात त्याने पाच षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स – सहा बाद १८७
चेन्नई सुपर किंग्ज – सर्व बाद १६२

सामनावीर – किरेन पोलार्ड(मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *