ग्रामीण भागाचा होणार नियोजित विकास

जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्याचे प्रारूप प्रसिद्ध झाले आहे. या आराखड्यात पाच नागरी, तर तीन ग्रामीण विकास संकुले, सहा नागरी, तर सहा ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित केली आहेत. या संकुले व केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 124 गावांचा नियोजनबद्ध विकास साधला जाणार आहे. कोल्हापूर-कराड-पुणे असा थेट रेल्वेमार्ग असावा, अशी अपेक्षाही या आराखड्यात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रादेशिक आराखड्यात कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल व गडहिंग्लज ही पाच नागरी संकुले प्रस्तावित करण्यात आली आहेत. कोल्हापूर नागरी संकुलाचा विकास करताना कोल्हापूरसह भोवतालच्या करवीर तालुक्यातील 40, तर हातकणंगले तालुक्यातील 17 अशा एकूण 57 गावांचा व कोल्हापूर महापालिकेचा या संकुलात समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत प्रस्तावित केलेल्या गावांसह निगवे दुमाला, कापूरवाडी, हालोंडीपर्यंतची गावे या संकुलात समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, या विकासाचा आणि हद्दवाढीचा कोणताही संबंध नाही, केवळ कोल्हापूर शहराला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवतालच्या या गावांचा विकास केला जाणार आहे.
या आराखड्यात हुपरी, कोडोली व हातकणंगले ही तीन ग्रामीण विकास संकुले प्रस्तावित केली आहेत. हुपरी संकुलात सात गावांचा, कोडोली संकुलात आठ गावांचा, हातकणंगले संकुलात सहा गावांचा समावेश आहे. यासह शाहूवाडी, गगनबावडा, गारगोटी, आजरा, राधानगरी व चंदगड ही सहा नागरी विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. बांबवडे, कुंभोज, भादोले, अब्दुललाट, दानोळी, उत्तूर ही सहा ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या आराखड्यात कराड-बेळगाव रेेल्वेमार्ग कोल्हापूर शहराजवळून जाणे आवश्यक आहे. सध्याच्या कराड ते कोल्हापूर या रेल्वेमार्गाने अंतर वाढत आहे. यामुळे कोल्हापूर ते कराड पुढे पुणे असा थेट रेल्वेमार्ग आवश्यक आहे. यामुळे हा मार्ग शहराला जोडण्यासाठी सर्वेक्षण नियोजन व्हावे, असे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणारा कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग सोलापूर, हैदराबाद, सिकंदराबाद ते हावडा अशाप्रकारे पूर्व भारताला जोडणारा रेल्वेमार्ग म्हणून आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सोलापूर या मार्गावर थेट रेल्वेमार्ग तसेच त्याचे दुहेरीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. यासह कोल्हापूर व इचलकरंजी शहरासाठी रिंगरोडही प्रस्तावित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *