उल्हासनगर-सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

पश्‍चिम बंगालमधून उल्हासनगर शहरात नोकरीचे आमिष दाखवून आणलेल्या 20 वर्षीय तरुणीची सुटका गुन्हे अन्वेषण विभागाच्या मानवी तस्करविरोधी पथकाने (ठाणे) नुकतीच केली. याप्रकरणी सेक्स  रॅकेट चालवणार्‍या पश्‍चिम बंगालमधील एका दलालासह चारजणांना पोलिसांनी अटक केली. पीडित तरुणीला उल्हासनगरमध्ये आणले गेले आणि नंतर तिला यवतमाळ जिल्ह्यात विकण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये फरीद गाझी (23, रा. पश्‍चिम बंगाल), जयदेव उर्फ अजय नासकर (30) त्याची पत्नी नजमा नासकर दोघेही रा. उल्हासनगर, दुर्गा उर्फ सलोनी राऊत (30, रा. पुसद, जि. यवतमाळ) या चौघांचा समावेश आहे.

16 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मानेरेगाव, उल्हासनगर- 4 येथील सिद्धीविनायक इमारतीमध्ये राहणार्‍या दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. या महिला जयदेव नासकर याच्यासोबत बेकायदेशीररीत्या राहत होत्या. नासकर याने स्थानिक व ठाणे पोलिसांना परदेशी महिलांसोबत राहत असल्याची माहिती लपवून ठेवली. याबाबत नासकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या महिलांना का आणले? त्यामागे त्याचा उद्देश कोणता? याबाबत आम्ही तपास केल्यानंतर पासपोर्ट ऍक्ट 1950 आणि फॉरेनर ऍक्ट 1971 अन्व्ये आरोपींच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती क्राईम ब्रांचच्या मानवी तस्करीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

17 सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस पथकाने राऊतच्या घरात धाड टाकली. या वेळी नासकर याने पीडित तरुणीला 3 हजार रुपये प्रतिदिनच्या बोलीवर विकले होते. दिवसभरात तिला 6 गिर्‍हाइकांशी शरीरसंबंध ठेवावे लागायचे. जेव्हा पोलिसांनी पीडित तरुणीची डायरी तपासली तेव्हा 15 सप्टेंबर रोजी तिला 7 हजार रुपये एका गिर्‍हाइकाने एका रात्रीसाठी दिले होते. 16 सप्टेंबर रोजी दोन गिर्‍हाइकांनी 2 हजार रुपये दिले होते. दुर्गा ही बर्‍याच काळापासून स्थानिक पोलिसांच्या रडारवर होती. तिचे घर व्हाईट हाऊस म्हणून प्रसिद्ध होते. ज्यात सर्रासपणे कुंटणखाना चालवला जात होता. येथे पीडित मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय केला जात होता, त्यामुळे  पोलिसांनी तिलाही अटक केले.

या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग ठाणेच्या (मानवी तस्करविरोधी पथकाने) आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर उल्हासनगर येथील  विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्यांच्याकडून 35 हजार 620 रुपये रोख, दोन मोबाईल फोन असा 39 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *