सिल्लोड : मुसळधार पावसाने पिके उद्‍ध्‍वस्‍त

सिल्लोड तालुक्यासह शहरावर दोन दिवसांपासून पडत असलेल्‍या संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अंभई-उंडनगाव तसेच गोळेगाव-अजिंठा या परिसरात काल रात्री वादळ, वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार २८ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे या भागातील उभी पिके खराब झाल्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर तालुक्यात सरासरी ५६५ मिमी इतका पाऊस झाला आहे. केळगाव लघु प्रकल्प ओसंडून वाहायला लागला तर या भागातील अजिंठा-अंधारी,पालोदचा खेळणा व हळदा-जळकी या तिन्ही मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीला सर्वदूर झालेल्या पावसाने इतर भागातही तालुक्यातील जसाठ्यात काहीशी वाढ होऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी काही प्रमाणात मदत होणार आहे.
तालुक्यातील पाझर तालावांसह शेततळे-वनतळे, मातीनाला व सिमेंटबांध, कोल्हापुरी बंधारे, लघु व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळीमध्ये या जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव व सोयगाव तालुक्यातील रावळा-जवळा, सोयगाव,बनोटी,व वरठाण हि लघु प्रकल्पही जवळपास भरत आलेली आहे. यातील केळगाव,रावळा-जवळा व सोयगाव लघुप्रकल्प ओसंडून वाहू लागले असून इतर प्रकल्पांची पाणीपातळी वाढली आहे.
 
जलसाठ्यांची स्थिती….
रावळा-जवळा १०० टक्के,पिंपळवाडी २६ टक्के,सोयगाव १०० टक्के ,बनोटी ८४ टक्के ,वरठाण २३ टक्के , देव्हारी ११टक्के , तींगापुर ९ टक्के, केळगाव १०० टक्के , हिवरी १५ टक्के ,रहिमाबाद,उंडनगाव, आदी लघु प्रकल्पात कमी जास्त जलपातळीत वाढ होणे सुरु असून अजिंठा-अंधारी २४ टक्के ,हळद-जळकी ३१ टक्के ,निल्लोड ९ टक्के खेळणा , चारणेर या मध्यम प्रकल्प मध्येही जलपातळीत सतत धिम्यागतीने वाढतच असून शहर व मतदार संघातील जनतेच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.पावसाळ्याचे जवळपास दहा दिवसच शिल्लक राहिलेला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होणार आहे.
तालुक्यातील अर्ध्या भागात शेतकऱ्यांची पिके खाली पडली असून वीज पडल्याने उंडनगाव, वसई येथे दोन म्हशी तर कोबडावाडी येथील शेतकऱ्याची गाय वज पडल्याने दगावली आहे.
मंडळनिहाय शुक्रवारी झालेला पाऊस…
सिल्लोड तालुक्यात  वर्षी पावसाला जवळपास २० दिवस उशिरा सुरवात झाली असून आतापर्यंत सरासरीपेक्षा शंभराने कमी म्हणजेच ५६५ मिमी.इतका पाऊस पडला आहे. शुक्रवारी मंडळनिहाय झालेला पाऊस सिल्लोड ३१, आमठांना १९, अंभई ३९, भराडी २७, अजिंठा २२, बोरगाव बाजार २०, निल्लोड २५, गोळेगाव ४० मिमी असा पाऊस झालेला असून दि.२४ शनिवार रोजी सकाळ पासून पाऊस सुरु आहे.
शेकाऱ्यांची पीके झोपली, शासकीय मदत द्यावी : श्रीराम महाजन, जि. प. अध्यक्ष
शुक्रवारी रात्रीच्या वेळी तालुक्यात झालेल्या पावसाचे प्रमाण अंभई, पालोद, गोळेगाव, अजिंठा, उंडनगाव, रहिमाबाद या भागात अधिकचे होते. या भागात पावसाची सुरवातच ढगांच्या गडगडाटात व विजांच्या कडकडाटात तसेच वादळवाऱ्यासह सुरवात झाली. पाऊसही तितकाच दमदार होता मात्र या पावसाच्या जोडीला शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या वादलवाऱ्याचाही सहभाग असल्याने या भागातील शेतकऱ्यांची पिके आडवी पडली असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे या वादळवाऱ्याने झालेले आहे.
शासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करावे : आ. अब्दुल सत्तार
शुक्रवारी रात्रीला झालेल्या वादळवाऱ्याच्या पावसाने तालुक्यातील अर्धाभाग प्रभावित झाला असून अत्यल्प पाऊस पिकांवर सातत्याने पाळणारे विविध रोग-कीडीमुळे तसेच दुष्काळाच्या छायेत गेल्या ३ वर्षे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी हाल अपेष्ठाच आहेत की काय असा प्रश्न पडतो. शासनाने तातडीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आ.अब्दुल सत्तार यांनी दैनिकशी बोलतांना केली असून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देवू असे सांगितले आहे.
 
शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचेचे : भाजप
वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांची पिके झोपली असून या मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे या करीता शासनाने नुकसानिची भरपाई करून देणे गरजेचे असल्याची मागणी भाजपाचे इंद्रिस मुलतानी,ज्ञानेश्वर मोठे ,सुरेश बनकर आदींनी केली आहे.
महसूल व कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल : तहसिलदार संतोष गोरड
तालुक्यातील सर्वच भागात शुक्रवारी रात्रीपासून चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने या भागातील जनतेच्या दृष्टीने आनंदाची बाब असून काही भागातील पिकांची हानी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अशा भागात जाऊन प्रत्यक्ष पाहनी करण्याच्या सूचना आमच्या कर्मचाऱ्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहीती देतांना तहसिलदार संतोष गोरड म्हणाले. काही ठिकाणी वीज पडल्याने जनावरे दगावली आहेत त्याचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाईल पाऊस हा सतत सुरु असून अजून पर्यंत अतिवृष्‍टी इतका पाऊस झालेले नाही. मात्र पाऊस सुरूच असल्याने पुढे किती आकडा पाऊस गाठतो पाहूनच कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *