मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये आलेल्या खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौफेर टीका केली. कोपर्डी बलात्काराची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काळीमा असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल, असे ते म्हणाले. कोपर्डी घटनेतील नराधम संशयितांना जाहीर फाशी द्या, अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्यात, असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये मराठा समाजाच्या विराट मोर्चात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांची संवाद साधला.
ते म्हणाले, ‘मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीत. मराठा ही जात नसून ती एक जगण्याची संस्कृती आहे.’ कोपर्डी बलात्कारातील गुन्हेगारांना जाहीर फाशी द्या, त्यांना लोकांसमोर गोळ्या घालून ठार मारा, असा घणाघात उदयनराजे यांनी केला. पीडितांना त्वरीत न्याय देणे देशाच्या हिताचे आहे. पण न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा.’ ‘मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे,’ असे उदयनराजे म्हणाले.
आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले. राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या. नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात तर उद्योगपती कर्ज बुडवतात, अशी टीका त्यांनी केली.