दुचाकी उडणार आकाशी…

दुचाकी उडणार आकाशी…

एक तासात ऑफिसमध्ये पोहचायचंय… ट्रॅफिक जाम. रस्त्यावर जागोजागी खड्डे…. अंतराअंतरावर सिग्नल. घराबाहेर पडल्यानंतर प्रवास करताना थोड्याफार फरकाने जागोजागी हीच परिस्थिती. परंतु, कमीत कमी वेळात जास्त अंतर अन्‌ तेही विनाट्रॅफिक, विनासिग्नल? हो, असा प्रवास काही दिवसांतच शक्‍य होणार आहे. कारण, दुचाकी चक्क आकाशात उडणार असून, आपल्याला हव्या त्या ठिकाणी वेळेत पोचता येणार आहे.
विज्ञानामुळे अनेक अशक्‍य गोष्टी शक्‍य होत आहेत. विज्ञानातील प्रगतीमुळे नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळू लागल्या आहेत. तेव्हा दुचाकी हवेतून उडू लागली, तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. अमेरिकेतील एका कंपनीने हवेत उडणारी दुचाकी प्रायोगिक तत्त्वावर तयार केली आहे. दुचाकीवर दोघे जण बसून हवेतून प्रवास करू शकतील. २०१७ पर्यंत ही दुचाकी बाजारात येईल. या दुचाकीवरून दहा फूट उंचीवरून ७२ कि.मी. प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पाला ‘एयरो-एक्‍स होवर’ असे नाव देण्यात आले असून, या दुचाकीची किंमत ८५ हजार डॉलर एवढी असेल. या दुचाकीचे बुकिंगही सुरू झाले आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या दुचाकीसाठी कार्बन फायबर रोटर्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे उड्डाणासाठी अथवा उतरण्यासाठी रन-वेची गरज भासणार नाही. सर्वसाधारण दुचाकीसारखीच ही दुचाकी असेल. दुचाकी चालविण्याचे एक-दोन दिवस प्रशिक्षण घेतल्यास ती कोणालाही चालवता येईल. तिचे वजन साधारणतः ३५६ किलो असेल आणि १४० किलो वजन वाहून नेण्याची तिची क्षमता असेल. एकदा इंधन भरल्यानंतर ७५ मिनिटांपर्यंत हवेतून ती प्रवास करू शकेल. हवेतून उडणार असल्यामुळे या दुचाकीला ‘फ्लाइक’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या वर्षी या प्रयोगाला सुरवात करण्यात आली. सुरवातीला हेलिकॉप्टरप्रमाणे तीन पंखे या दुचाकीला जोडण्यात आले होते. तीन पंखांच्या जोरावर उडू लागल्यानंतर हळूहळू बदल करण्यात आले. यामुळे तिचा ‘लूक’ही बदलला आहे. पूर्णपणे तयार होऊन बाजारात आल्यानंतर ती आगळ्या-वेगळ्या प्रकारात पाहायला मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने हवेत उडणाऱ्या दुचाकीचे व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर अपलोड केले आहेत. जगातील हवेत उडणारी पहिली दुचाकी असे तिला नाव देण्यात आले आहे. जगभरातील दुचाकीप्रेमींना यामुळे रस्त्याबरोबरच हवेतून उडण्याचा आनंद घेता येईल. जगभरातील विविध देशांमध्ये सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. अशा प्रयत्नांमुळे काही प्रमाणात तरी हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे म्हणणे लगेच उचित ठरणार नाही. शिवाय, तिच्या किमतीवरून सर्वांनाच ती घेणे शक्‍य होईल असेही नाही. पण, दुचाकीप्रेमींसाठी हा आगळा-वेगळा प्रवास असेल. काही वर्षांनी हवेतून दुचाकींची रॅली निघालेली दिसल्यास नवल वाटू नये. सर्वसामान्य नागरिकांना तिची किंमत परवडल्यास हा प्रवास सुखकर होईल, एवढे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *