अलिबाग येथील कुलाबा भूचुंबकीय वेधशाळा बुधवारी १७५ वर्षांची झाली आहे. भूचुंबकीय शक्तीचा आणि हालचालीचा वेध घेण्याचे काम इथे अव्याहतपणे केले जात आहे. भूगर्भ आणि हवामानातील चुंबकीय लहरींचे अतिसूक्ष्म नोंदीचे संकलन या ठिकाणी उपलब्ध आहे. जगभरातील चार सर्वात जुन्या चुंबकीय वेधशाळांमध्ये या वेधशाळेचा समावेश असून जागतिक पातळीवर भूगर्भ शास्त्रज्ञ, भूभौतिक शास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासकांकडून कुलाबा वेधशाळेच्या नोंदींना खूप महत्त्व असते.
ब्रिटिशांनी १८४ साली मुंबईतील कुलाबा येथे कुलाबा वेधशाळेची स्थापना केली. मुंबई बंदरातील खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची स्थापना करण्यात आली. रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्या शिफारसीनुसार भूचुंबकीय क्षेत्राचे नियमित मापन सुरू करण्यात आले. १८४६ पासून दर तासाला सुसंगतपणे भूचुंबकीय लहरींच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. मॅग्नेटोग्राफच्या साह्य़ाने फोटोग्राफीक पद्धतीने या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या. १८९६ च्या सुमारास डॉ. नानाभॉय आर्देशर फार्मजी मुस यांनी कुलाबा वेधशाळेची धुरा सांभाळली. त्याकाळात मुंबईत वाहतुकीसाठी घोडय़ावर चालणाऱ्या ट्राम्स वापरल्या जात असत. मात्र १९०० सालच्या सुमारास मुंबईतील ट्राम्सचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भूचुंबकीय नोंदीच्या संकलनात अडथळे निर्माण होणार होते. त्यामुळे कुलाबा येथील वेधशाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावेळी वेधशाळेसाठी १२ जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावरील सात एकरची जागा निवडण्यात आली. चुंबकीय परिणामांपासून मुक्त अशा दोन इमारती येथे बांधल्या गेल्या. पोरबंदर येथील दगड, वाळू आणि तांब्यापितळाच्या वस्तूंचा वापर करून या ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. बाहेरील तापमानाचा परिणाम न होणाऱ्या एका इमारतीत मॅग्मोमीटर बसवण्यात आले. तर दुसऱ्या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्रातील विविध घटकांचे निरपेक्ष मापन सुरु झाले. १९०४ साली अलिबाग येथील कुलाबा वेध शाळेतून भुचुंबकीय लहरीचे मापन सुरू झाले. ते आजही अव्याहतपणे सुरू आहे.
ब्रिटिशांनी १८४१ साली सुरू केलेल्या कुलाबा चुंबकीय वेधशाळेला बुधवारी तब्बल १७५ वर्षे पूर्ण झाली आहे. जगभरातील सर्वात जुन्या चुंबकीय वेधशाळामध्ये या कुलाबा वेधशाळेचा समावेश आहे. भूवैज्ञानिक, भूभौतिक शास्त्रज्ञ, प्लाझ्मा भौतिक शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भूगर्भ शास्त्रज्ञ कुलाबा वेधशाळेच्या नोंदीना प्रमाण मानतात. भूचुंबकीय घडामोडींचे अचूक आणि संकलन या ठिकाणी जनरल्सच्या स्वरूपात संकलित आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि रशिया येथील वेधशाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याकाळात फक्त अलिबाग येथील वेधशाळा कार्यरत होती. त्यामुळे गेल्या पावणे दोनशे वर्षांतील भूचुंबकीय हालचालींचे अविरत संकलन असणारी ही जगातील एकमेव वेधशाळा असल्याचे सांगितले जाते.
काळानुसार गरज लक्षात घेऊन चुंबकीय वेधशाळेत बदल होत गेले. १९९७ सालापासून इंटरमॅग्नेट या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची गरज म्हणून १ मिनट इतक्या सुक्ष्म कालावधीत होणाऱ्या भुचुंबकीय बदलांची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर या नोंदी पाठवल्या जात आहेत. चुंबकीय वेधशाळांचा उपयोग हा प्रामुख्याने चुंबकीय वादळांची तसेच प्रक्रियांची नोंद घेण्यासाठी होत असला, तरी अलिकडच्या काळात वेधशाळेत संकलित होणाऱ्या डीएसटी इंडेक्सचा वापर अवकाशातील हवामानांचा अभ्यास करण्यासाठी, तसेच पाषाणातील चुंबकीय गुणधर्माच्या नोंदीसाठी होत असल्याचे भारतीय भूचुंबकीय संस्थेचे वैज्ञानिक प्रवीण गवळी आणि अशोक देशमुख यांनी सांगितले.