भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी भारताचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव या शेवटच्या जोडीने आणखी २७ धावांची भर घातली. पहिल्या दिवशी भारताच्या ९ बाद २९१ धावा झाल्या होत्या.
रविंद्र जाडेजा (४२) धावांवर नाबाद राहिला. उमेश यादवला वॅगनरने वॅटलिंगकरवी झेलबाद केले. त्याने वयैक्तिक ९ धावा केल्या. न्यूझीलंडची गुप्टील आणि लॅथहॅम ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. दोन षटकात न्यूझीलंडच्या बिनबाद ११ धावा झाल्या आहेत. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर ही धावसंख्या पुरेशी मानली जात आहे.
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे एकवेळ भक्कम स्थितीत असलेली भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यात अलगद अडकताच ऐतिहासिक ५०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ९ बाद २९१ अशी स्थिती झाली. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फिरकीला साथ मिळत असल्याने भारताच्या या धावा तशा पुरेशा मानल्या जात आहेत.